x
#
#
#
About Us

क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी, महाराष्ट्र.

क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरीची स्थापना दि. १८ ऑक्टोबर २००७ रोजी झाल्याचे आपण बहुसंख्य जण जाणताच, मंडळाची प्रत्यक्ष स्थापना जरी यादिवशी झाली असली तरी, हे मंडळ स्थापन होण्यामागची कथा मात्र रंजक आहे. किंबहुना मंडळाच्या स्थापनेचा हा इतिहास फारच कमी लोकांना माहीत आहे.

जानेवारी २००७ मध्ये रत्नागिरी मधील कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची सभा हॉटेल विवेक येथे घेण्यात आली होती. या सभांना मराठा समाजातील कॉन्ट्रॅक्टरची उपस्थितीची संख्या लक्षणीय असायची. त्यावेळी आपण सर्वजण इतर संस्थासाठी काम करीत असतो परंतु आपल्या मराठा समाजासाठी काहीच करत नाहीत अशी भावना काही मंडळींनी व्यक्त केली. आणि तेथेच त्यांनी मराठा समाजासाठी काहीतरी करावे या उद्देशाने मराठा मैदानावरती आपापल्या सर्कलमधील मराठा तरुणांनी दोन दिवसांनी याच ठिकणी एकत्र येण्याचे ठरविले.



संघटित होण्याच्या ध्येयाने पेटलेल्या या मराठा बांधवांच्या सभा होऊ लागल्या. शिवजयंतीचा उत्सव शोभायात्रा आयोजित करून साजरा करण्याचे ठरविण्यात आले, ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक वेशभूषेत जयस्तंभ ते मारूतीमंदीर येथील शिवपुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेचे विशेष आकर्षण होते ते म्हणजे चित्ररथ, घोषवाक्य आणि बॅनर. शहर आणि शहराच्या आजुबाजुच्या गावामधुन फार मोठ्या प्रमाणावर समाज बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले होते. अशाप्रकारे हा पहिला कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे आयोजित केला गेला.

पुढे मार्चमहीन्यात या सर्व कार्यकर्त्यांनी गुढीपाडवा हा आपला सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्याचे ठरविले. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आपल्या समाजाप्रतीचा हा जोश कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिसुन येऊ लागला. पुन्हा बैठका होऊ लागल्या नियोजन करण्यास सुरुवात झाली आणि यातुनच सुलोचना चव्हाण यांचा गीतांचा कार्यक्रम आपल्या रत्नागिरीत मराठा मैदानात घेण्याचे निश्चत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करुन कार्यकर्त्यांनी मराठा समाजाची ताकद पुन्हा एकदा दाखवुन दिली.

आता या संघटित झालेल्या मावळ्यांना एका छताखाली बांधुन ठेवणे गरजेचे होते आणि ही गरज लक्षात घेऊन समाजबांधवांचे अस्तित्व असलेल्या मंडळात सभासद करुन घ्यावे असे निश्चित करण्यात आले. यासाठी अस्तित्वात असलेल्या मंडळाकडे सर्व तरुण कार्यकर्ते पोहचले आणि सर्वांना मंडळाचे सभासद करुन घ्यावे. अशी विनंती त्यांना करण्यात आली. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग एकत्र आला असताना केवळ तरुण पिढील प्राधान्य दिले तर, मंडळाचे अस्तित्व धोक्यात येईल की काय? अशी शंका मनात आल्याने सभासद फी अचानक वाढविण्यात आली जेणेकरुन तरुण वर्गाला ही फी भरणे शक्य होणार नाही आणि आपसुकच ही मंडळी सभासद होणार नाही. आणि झाले पण तसेच वाढवलेली सभासद फी एवढी होती की, ते सामान्य मराठा मावळयाला भरणे अशक्य होते.

आणि हीच ती वेळ होती एवढया कष्टाने मराठा समाजातील तरुण तरुणी जेष्ठांना संघटित करुन पण एका छताखाली आणता येत नव्हते आणि संघटित झालेला हा माझा तरुण वर्ग पुन्हा एकदा भरकटेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आणि याचवेळी सर्वश्री. सुरेशराव सुर्वे, भाऊ देसाई, केशवराव इंदुलकर, सतिशराव साळवी, दिवाकर साळवी या सर्वांच्या मदतीने नवीन मंडळ स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले.

पुन्हा बैठका होऊ लागल्या समाज बांधव पुन्हा पेटुन उठला आणि मंडळ कसे असावे, सभासद कसे हवेत, मंडळाची ध्येय -धोरणे कशी असावीत या सगळयाचा सखोल विचार करण्यात आला. आणि हॉटेल विवेकच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये नवरात्री मधील १८ ऑक्टोबर २००७ रोजी आपले क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी नोंदणीकृत करण्यात आले. मंडळाची स्थापना झाल्यावर दरमहिन्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका होऊ लागल्या. यातुन मंडळाची ध्येय धोरणे विविध कार्यक्रम निश्चित करुन त्याप्रमाणे त्यावर कारवाई करण्यात येऊ लागली. अशाप्रकारे मंडळ प्रगतीपथावर आले.

पुढे, मंडळातर्फे दरवर्षी वर्धापनदिन, शिवजयंती शोभायात्रा , वधु-वर सुचक मेळावा, महिलांचे हळदीकुंकु, हळदा कुकु, गुणवतांचा गौरव, मान्यवरांचे सत्कार, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, रक्तदार शिबिर, हस्ताक्षर स्पर्धा, पाककला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा कितीतरी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आज आपल्या मंडळाचे नाव जिल्ह्यात अभिमानाने घेतले जाते. शून्यापासून सुरुवात करुन आज आपण ७५० सभासदांपर्यंत पोहचु शकलो. लवकरच ही संख्या हजाराच्या वर जाईल यात शंकाच नाही. मंडळाच्या या यशात तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या कडुन असेच कार्य घडत राहोत ही आई तुळजाभवानीमातेच्या चरणी प्रार्थना.



#
Join us

क्षत्रिय मराठा मंडळात सामील व्हा!

क्षत्रिय मराठा मंडळ हे मराठा समाजाच्या एकतेचे प्रतीक आहे. आपल्या परंपरा, संस्कृती, आणि सामाजिक वारसा जपण्यासाठी मंडळ विविध उपक्रम राबवते. शिवजयंती, गुढीपाडवा यांसारख्या सणांचे आयोजन, युवकांसाठी शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आणि महिलांसाठी सक्षमीकरणाचे कार्यक्रम ही मंडळाची खास वैशिष्ट्ये आहेत. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांत सहभाग घेऊन आपण समाजासाठी योगदान देऊ शकता.

आपल्या मराठा समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेण्यासाठी मंडळ हे आदर्श व्यासपीठ आहे. आपल्या योगदानातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना द्या आणि मराठा बांधवांसाठी प्रेरणादायी बना. "आई जगदंबेच्या कृपेने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, समाजासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे!"



संपर्क साधा
#
#
#
Testimonials

मान्यवरांच्या बोलक्या प्रतिक्रिया